◆ महिलांच्या आरोपानी वाढवली अडचण
वणी वृत्तवेध : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) मध्ये हजारो कामगार कार्यरत असून त्यांच्या हक्कांसाठी विविध कामगार संघटना कार्यरत आहेत. मात्र, कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी वादग्रस्त कारवायांमुळे चर्चेत आलेल्या एका कामगार नेत्याची अखेर वेकोली सुरक्षा समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. महिलांशी संबंधित गंभीर आरोपांमुळे या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

वेकोलीच्या वणी नॉर्थ एरियातील संबंधित नेत्यावर यापूर्वी रेल्वे सायडिंगवर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच वेकोली वसाहतीत एका महिला वकीलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली. या घटनांमुळे कामगार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कामगार संघटनांच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर इंडियन माईन वर्कर्स फेडरेशन (AITUC) ने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या सुरक्षा मंडळातील आपल्या प्रतिनिधीत्वात तातडीने बदल केला आहे. यासंदर्भात समन्वय समितीचे समन्वयक सी. जे. जोसेफ यांनी महाव्यवस्थापक (S&R), WCL नागपूर यांना अधिकृत पत्र पाठविले आहे.पत्रानुसार, SKMS (AITUC) चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या त्या नेत्याचे नामनिर्देशन तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले आहे


त्यांच्या जागी स्वप्नील बी. व्यास, ओव्हरमन, सावनेर खाण क्रमांक 1, नागपूर क्षेत्र यांची तात्पुरत्या स्वरूपात वेकोली सुरक्षा मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित सदस्याची नियुक्ती होईपर्यंत व्यास हे AITUC चे प्रतिनिधी म्हणून सुरक्षा मंडळावर कार्य पाहणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलांवरील गुन्ह्यांच्या आरोपांमुळे एका कामगार नेत्याला सुरक्षा समितीतून बाहेरचा रस्ता दाखवावा लागल्याने वेकोली वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.









