◆ जनावरे हाकत घरी परतताना दुर्दैवी घटना
वणी वृत्तवेध :-तालुक्यातील कुंभारखनी येथे सोमवारी सायंकाळी निसर्गाच्या रौद्र रूपाने एका महिलेचा जीव घेतला. सुरेखा सुधाकर चट्टे (वय ४०) या शेतातून जनावरे घेऊन परतत असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी घडली असून गावात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, सुरेखा चटे या पतीसह शेतात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. काळे ढग दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला. पती घरी परतल्यानंतर सुरेखा या जनावरांची व्यवस्था करून घरी येत होत्या. मात्र, निसर्गाने अचानक घाला घालत त्यांच्या अंगावर वीज कोसळली.

बराच वेळ त्या घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. शोध घेतला असता त्या शेतात निपचित अवस्थेत आढळून आल्या. ही घटना समजताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










