◆ मुकुटबन पोलिसात तक्रार
वणी वृत्तवेध : झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीतील कामगारांच्या सुविधांच्या प्रश्नावरून मनसे पदाधिकाऱ्यांवर मुकुटबन पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू असून कामगारांच्या प्रश्नांवरून हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, कंपनीतील सिमेंट पॅकिंग विभागात काम करणाऱ्या कामगारांना प्रचंड उष्णतेत काम करावे लागत असल्याची बाब मनसे कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. संबंधित ठिकाणी तब्बल ४६ डिग्री तापमान असल्याने कामगारांचे हाल होत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.

यानंतर मनसे नेते राजू उंबरकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व चंद्रकांत गावंडे यांनी काही कार्यकर्त्यांसह कंपनी परिसरात भेट देऊन कामगारांच्या अडचणींबाबत कंपनी प्रशासनाशी चर्चा केली होती. वाढत्या तापमानात कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली त्या नंतर कंपनी ने कामगारांना सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितल्या जात आहे.


दरम्यान, या भेटीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कंपनीचे सहाय्यक उपाध्यक्ष दिलीपकुमार मिश्रा यांनी मुकुटबन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत धमकावणे व व्हिडीओ प्रसारित केल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत.
या घटनेनंतर परिसरात विविध प्रतिक्रिया उमटत असून काही जणांकडून कामगारांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणाऱ्यांवर कारवाई झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणाचा पुढील तपास मुकुटबन पोलिसांकडून सुरू आहे.

कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कामगारांनी अडचणी मांडल्यानंतर आम्ही केवळ त्यांची बाजू कंपनी प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. कोणावर दबाव टाकण्याचा अथवा कायदा हातात घेण्याचा आमचा हेतू नव्हता. आणि घेतला देखील नाही कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे पोलिसांनी ते तपासावे त्यातून सत्यता बाहेर येईल माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यां वर लावलेले गुन्हे खोटे आहे
राजू उंबरकर , मनसे नेते








