◆ शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
वणी वृत्तवेध :-मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील शेतकरी अनिल जयराम गाडगे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागून गोठा व त्यातील साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याने ऐन शेती हंगामाच्या तोंडावर गाडगे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

अनिल गाडगे यांनी जनावरांसाठी चारा साठविणे तसेच शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेतात गोठा उभारला होता. गुरुवारी दुपारी अचानक गोठ्यातून धूर निघत असल्याचे दिसून आले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत गोठ्यातील शेती अवजारे, जनावरांचे खाद्य, कडबा व इतर साहित्य जळून खाक झाले होते.

शेतकऱ्याच्या कष्टाची वर्षानुवर्षे जमवलेली साधनसामग्री काही मिनिटांत राख झाल्याने गाडगे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यावर या आगीमुळे आणखी संकट ओढवले आहे.


आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऐन पेरणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून शासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
“शेतकऱ्याच्या घामाने उभा राहिलेला गोठा काही क्षणांत जळून खाक झाला; पण त्याचबरोबर त्याच्या आगामी हंगामाच्या अनेक आशाही राख झाल्या,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली









