◆ कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे लक्ष
वणी वृत्तवेध :मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावरून मनसे नेते राजू उंबरकर, फाल्गुन गोहोकार आणि चंद्रकांत गावंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (दि. १ जून) वणी तहसील कार्यालयावर धडक देण्याचा इशारा दिला होता. मात्र या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापले असून आता मनसे कार्यकर्ते कोणता पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या माहितीनुसार, मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनीत कामगारांना प्रचंड उष्णतेत काम करावे लागत होते तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी कंपनी परिसरात जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेत कंपनी प्रशासनाकडे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

मनसेचा दावा आहे की, या हस्तक्षेपानंतर कंपनी प्रशासनाने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र त्यानंतर कंपनीच्या तक्रारीवरून राजू उंबरकर, फाल्गुन गोहोकार आणि चंद्रकांत गावंडे यांच्याविरुद्ध मुकुटबन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवल्यामुळे सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.


या पार्श्वभूमीवर संबंधित गुन्हे तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय मनसेने घेतला होता. मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस प्रशासनाच्या या निर्णयानंतर मनसे कार्यकर्ते काय भूमिका घेतात या कडे लक्ष लागले असून, परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलनाची भूमिका कायम ठेवली जाणार का, पर्यायी मार्गाने निवेदन दिले जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस वणीतील राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









