Home Breaking News गुन्हेगारी आणि आरसीसीपीएल प्रकरणावर राजू उंबरकरांचा घणाघात

गुन्हेगारी आणि आरसीसीपीएल प्रकरणावर राजू उंबरकरांचा घणाघात

निवेदन देत पोलिसांना थेट सवाल

वणी वृत्तवेध : संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी, अमली पदार्थांचा विळखा, शेतकऱ्यांवरील अन्याय आणि सिमेंट कंपनीच्या कथित गैरकारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी प्रशासन आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

यवतमाळ जिल्हा आणि विशेषतः वणी विधानसभा क्षेत्र एमडी ड्रग्ज, अवैध दारू, गांजा, मटका आणि कोट्यवधींच्या क्रिकेट सट्ट्याचे केंद्र बनल्याचा गंभीर आरोप उंबरकर यांनी केला. “अवैध धंदे सुरू असताना एकाही मोठ्या सट्टेबाजावर कारवाई होत नाही, हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या क्रिकेट सट्टा रॅकेटविरोधात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उंबरकर यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्याचे नाव पीकविमा आणेवारीच्या पहिल्या यादीत नसणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या धोरणांविरोधात मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, वणी परिसरातील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीवरही उंबरकर यांनी गंभीर आरोपांची सरबत्ती केली. कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी चोरी आणि महसूल बुडविला जात असल्याचा दावा करत त्यांनी महसूल, आरटीओ आणि खनिज विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनीच्या वजनकाट्यांच्या नोंदी आणि महसुली व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

याहून गंभीर आरोप करताना उंबरकर म्हणाले की, वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गावर कंपनी उभारण्यात आली असून संरक्षण भिंतीमुळे वन्यप्राणी शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात कंपनीला परवानगी कशी देण्यात आली, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने उंबरकर यांनी संताप व्यक्त केला. “लोकशाहीत जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून यामागे राजकीय दबाव आणि षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा आरोप त्यांनी केला.

“परवानग्या नाकारून मनसेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. जनतेचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही परवानगीची वाट न पाहता ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन उभे करेल,” असा थेट इशारा राजूभाऊ उंबरकर यांनी दिला असून त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous articleमनसेच्या मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली
Next articleवणीत घरफोडी तीन लाखांचा ऐवज लंपास
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे