◆ विठ्ठलवाडी परिसरातील घटना
◆पोलिसांकडून तपास सुरू
वणी वृत्तवेध :शहरातील विठ्ठलवाडी-वडगाव रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(3), 331(4) व 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तालीब अय्युब खान (वय २८), रा. विठ्ठलवाडी-वडगाव रोड, वणी हे २२ मे रोजी घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले होते. ३१ मे रोजी दुपारी परत आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहिले असता बेडरूममधील आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा गोफ, सोन्याचा हार असा एकूण ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत सुमारे १ लाख ८५ हजार रुपये, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने किंमत ३० हजार रुपये तसेच ८० हजार रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत २ लाख ९५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.


अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत हा ऐवज लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करीत आहेत.
या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








