Home Breaking News वणीच्या ठाणेदारपदी भानुदास पिदूरकर

वणीच्या ठाणेदारपदी भानुदास पिदूरकर

◆ उंबरकर आर्थिक गुन्हे शाखा कारभार पाहणार

वणी वृत्तवेध :परीक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी जिल्हा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांची वणी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वणी पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील तसेच राज्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी एक मानले जाते. औद्योगिक, व्यावसायिक तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या ठाण्याचा कार्यभार मिळावा यासाठी अनेक अधिकारी इच्छुक असतात. नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणाची तरी या पदावर नियुक्ती होईल, अशी चर्चा होती. मात्र जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये भानुदास पिदूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भानुदास पिदूरकर यांनी यापूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून वणी येथे कार्य केले असल्याने त्यांना शहर व परिसराची चांगली माहिती आहे. स्थानिक परिस्थिती, सामाजिक घडामोडी आणि कायदा-सुव्यवस्थेची जाण असल्यामुळे ठाण्याचा कारभार सांभाळताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

मात्र, वणी शहर व परिसरात अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विशेषतः कोंबड बाजार, गोवंश तस्करी, मटका-जुगार, भंगार चोरी तसेच सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर प्रभावी कारवाई करून या प्रकारांचे समूळ उच्चाटन करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नव्या ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी आशा वणीकरांनी व्यक्त केली आहे.

Previous articleअवघ्या महिन्याभरात 50 हजार वाचकांची पसंती
Next articleनगरसेवकांचे स्वप्न भंगले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माघार
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे