Chandataknews
Chandrapur
चंद्रपूर, दि. 21 नोव्हेंबर – चंद्रपूर शहरातील रामनगर येथील जनता करिअर या खाजगी कोचिंग संस्थेच्या निवासी वसतिगृहात शिकत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी संस्थेतील चार जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
मृत विद्यार्थी धानोरा पिपरी (ता. जि. चंद्रपूर) येथे राहणारा होता. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी त्याने काही महिन्यांपूर्वी जनता करिअर कोचिंग संस्थेच्या निवासी शाखेत प्रवेश घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत विद्यार्थ्याने खोलीतील पंख्याला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.
विद्यार्थ्याचे वडील गुलाब सुदरी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. होस्टेलमधील वार्डन आणि अन्य कर्मचारी त्याच्यावर मानसिक छळ करीत असल्याची तक्रार त्याने पालकांकडे केली होती. पालकांनी त्याला समजावले, परंतु दुर्दैवाने परिस्थिती न सुधारल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणात पोलिसांनी जनता करिअर कोचिंगचे वार्डन लक्ष्मन रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटींग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे आणि प्राचार्य आशिष किष्णाजी महातळे यांच्याविरोधात भारतीय दंडसंहिता कलम १०७ व बालकविषयक कायद्यानुसार कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक इश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अन्य कोचिंग संस्थांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.








