Home Social विद्यार्थ्यां प्रवेशासाठी शिक्षकांची धाव धाव

विद्यार्थ्यां प्रवेशासाठी शिक्षकांची धाव धाव

◆कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी

वणी वृत्तवेध :तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शिक्षकांना अक्षरशः गावोगावी भटकंती करून विद्यार्थी मिळवण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व स्पर्धा निर्माण झाली असून, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रलोभनांची शर्यत सुरू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

वणी तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या शाळांची बस सेवा थेट खेडेगावांपर्यंत पोहोचत असल्याने पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे झपाट्याने वाढताना दिसत आहे. परिणामी तालुक्यातील ४० हून अधिक मराठी शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

विद्यार्थी संख्या कमी झाल्यास ‘अतिरिक्त’ होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक आता स्वतःच गावोगावी जाऊन पालकांना भेटत असून, “आमच्या शाळेत कोणत्या सुविधा मिळतील” याची माहिती देत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी तर गणवेश, पाठ्यपुस्तके, वाहन खर्च आणि विविध सवलती देण्याचे आश्वासन दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, काही शाळांकडून पालकांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातच एकप्रकारे ‘स्पर्धात्मक बाजारपेठ’ निर्माण झाल्याची टीका होत आहे.दरम्यान, लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाहने वणी तालुक्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जात असल्याने स्थानिक शाळांना मोठा फटका बसत आहे. शहरातील अनेक शाळांची पटसंख्या झपाट्याने घटत असून, शाळा-शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी चढाओढ सुरू झाली आहे.

या परिस्थितीचा परिणाम इतका गंभीर झाला आहे की, जवळपास चार मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात हीच स्थिती कायम राहिली, तर मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याचबरोबर जिल्हा परिषद शाळांची परिस्थितीही वेगळी नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. परिणामी पालकांचा विश्वास डळमळीत होत असून, ते पर्याय म्हणून खासगी शाळांकडे वळत आहेत.

ही केवळ शाळांची स्पर्धा नसून, मातृभाषेतील शिक्षण टिकवण्याची लढाई आहे. शासनाने तातडीने ठोस धोरण आखले नाही, तर ग्रामीण भागातील मराठी शाळा इतिहासजमा होण्याचा धोका आहे.”एकूणच, वणी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous articleएरंडेल तेली समाजाचा भव्य सामूहिक विवाह
Next articleवणी लायन्स कॉलेजचा उत्कृष्ठ निकाल
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे