Home Social बापरे… लसूण दोनशे, अद्रक शंभर रुपये किलो

बापरे… लसूण दोनशे, अद्रक शंभर रुपये किलो

◆ सामान्यांना महागाई चा चटका

वणी वृत्तवेध : बाजारातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला आणि मसाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून लसूण आणि अद्रकच्या किमतींनी तर उच्चांक गाठला आहे. सध्या बाजारात लसूण तब्बल २०० रुपये प्रतिकिलो तर अद्रक १०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असल्याने गृहिणींसह मध्यमवर्गीय नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

दररोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या या वस्तू अचानक महाग झाल्याने नागरिकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. अनेक कुटुंबांनी खर्चाचे नियोजन बदलत आवश्यक वस्तूंवरच भर देण्यास सुरुवात केली आहे. आधीच गॅस, तेल, डाळी व इतर किराणा वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता भाजीपाल्याच्या वाढत्या दरांनी आणखी अडचणीत टाकले आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, अवकाळी पाऊस, वाहतूक खर्चात झालेली वाढ तसेच बाजारातील कमी आवक यामुळे लसूण व अद्रकच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपासून घाऊक बाजारातच दर वाढल्याने किरकोळ बाजारात त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे.

महागाईमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडत असून शासनाने दर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आगामी काळातही दर कमी न झाल्यास सामान्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून लसूण व अद्रकची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच वाहतूक खर्च आणि घाऊक बाजारातील वाढलेल्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत असून विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा करावा लागू शकतो

प्रमोद निकुरे
व्यापारी,ठोक भाजी विक्रते

Previous articleखाजगी स्कूल बस व दुचाकीचा अपघात
Next articleतहान भागवणाऱ्या पाणपोई झाल्या गायब
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे