Home Wani सपोनि विजय महाले यांची एसआयडी मुंबई येथे बदली

सपोनि विजय महाले यांची एसआयडी मुंबई येथे बदली

◆ वणी वाहतूक शाखेत आता कुणाची वर्णी?

वणी वृत्तवेध : वणी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध करण्यासाठी विशेष ओळख निर्माण करणारे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विजय महाले यांची राज्य गुप्त वार्ता विभाग (एसआयडी), मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे वणी वाहतूक शाखेच्या पुढील नेतृत्वाबाबत पोलीस विभागात उत्सुकता निर्माण झाली असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सपोनि विजय महाले यांनी सुमारे वर्षभरापूर्वी वणी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही त्यांनी भर दिला. विशेष म्हणजे, कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी ते स्वतः शहरातील विविध चौकांमध्ये उपस्थित राहून वाहतुकीचे नियमन करत असल्याने त्यांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरली होती.

नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा स्थानिक कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली. या बदल्यांमध्ये विजय महाले यांची राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांच्या सेवेत महत्त्वाची मानली जात असून पोलीस विभागातही त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दरम्यान, महाले यांच्या बदलीनंतर वणी वाहतूक शाखेचे नेतृत्व कोणाकडे सोपविण्यात येणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

जिल्ह्यातील अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा पोलीस विभागाच्या वर्तुळात सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू केल्याचीही माहिती समोर येत आहे.

वणीसारख्या वाढत्या शहरात वाहतूक व्यवस्थापन हे मोठे आव्हान मानले जाते. त्यामुळे नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यापुढे वाहतुकीतील शिस्त कायम राखण्याबरोबरच वाढत्या वाहनसंख्येचा ताळमेळ साधण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे महाले यांच्या जागी कोणाची वर्णी लागते आणि वाहतूक शाखेच्या कारभाराला कोणती नवी दिशा मिळते, याकडे नागरिकांसह पोलीस विभागाचेही लक्ष लागले आहे.

Previous articleवणीत प्रथमच नर्सिंग व फार्मसी शिक्षणाची सुवर्णसंधी
Next articleआज मनसेची तहसील कार्यालयावर धडक
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे