Home Social बाजार समितीच्या जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे धोका वाढला

बाजार समितीच्या जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे धोका वाढला

◆ गळतीमुळे जीवित हानीची शक्यता

वणी वृत्तवेध : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचली असून टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहितीनुसार, बाजार समितीमध्ये दररोज मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. याशिवाय व्यापारी, हमाल व इतर कामगारांचाही मोठा वावर येथे असतो. त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. मात्र दीर्घकाळ दुरुस्ती व देखभाल न झाल्याने टाकीची अवस्था धोकादायक बनली आहे.

टाकीच्या सळाक्या उघड्या पडल्या असून अनेक ठिकाणी भेगा पडल्याने पाण्याची गळती सुरू आहे. टाकी कमकुवत झाल्यामुळे ती कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या परिसरात दिवसभर शेतकरी व मजूर वर्गाची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गंभीर बाबीकडे बाजार समिती प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जुनी टाकी पाडून त्या ठिकाणी नवीन व सुरक्षित पाण्याची टाकी उभारावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. येथे येणाऱ्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून वापरात असून तिची नियमित तपासणी व दुरुस्ती होणे आवश्यक होते. सध्या टाकीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून गळती सुरू आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने तांत्रिक पाहणी करून जुनी टाकी हटवून नवीन टाकी उभारण्याची आवश्यकता आहे.”
प्रमोद मिलमीले
माजी संचालक बाजार समिती वणी

Previous articleबीएसएनएल टॉवरमागे खुलेआम गांजा सेवन
Next articleविधान परिषद निवडणुकीवर वणीत काँग्रेसचे मंथन
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे