◆ १५ कोटींच्या स्वप्नाला निधीचा ब्रेक
वणी वृत्तवेध :तीन वर्षांपूर्वी वणीत झालेल्या भव्य शिवमहापुराण कथेदरम्यान मोठ्या उत्साहात जाहीर झालेला ‘रुद्राक्षबन’ प्रकल्प आज अपूर्ण अवस्थेत धूळ खात पडला आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाखो भाविकांसमोर वणीजवळ भव्य शिववन उभारण्याची घोषणा केली होती. धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प भविष्यात वणीची ओळख बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाला निधीअभावी ब्रेक लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प झपाट्याने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळामार्फत सुमारे १४ कोटी ९७ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. वणीपासून काही अंतरावरील निंबाळा (रोड) परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक ५३ मध्ये जागा निश्चित करून अवघ्या महिनाभरात मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

या प्रकल्पात रुद्राक्षाच्या झाडांसोबत औषधी वनस्पती, फुलझाडे, पर्यटकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सौंदर्यीकरण, कार्यालय, स्वच्छतागृह आदी सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मिळालेल्या तीन कोटी रुपयांत काही प्राथमिक कामेही करण्यात आली. मात्र त्यानंतर निधीचा प्रवाह थांबल्याने संपूर्ण काम रखडले.


स्थानिकांच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर या प्रकल्पाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. आज त्या परिसरात गवत आणि झुडपे वाढली असून उभारण्यात आलेल्या कामांची दुर्दशा होत आहे. “किमान रुद्राक्षाची झाडे तरी मोठ्या प्रमाणात लावली असती, तर हे ठिकाण आकर्षण ठरले असते,” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, वनविभागाचा हा पहिलाच रखडलेला पर्यटन प्रकल्प नाही. यापूर्वी मंदर परिसरातील निलगिरी वनातील ‘फॉरेस्ट पार्क’ प्रकल्पाचीदेखील अशीच अवस्था झाली. प्रवेशद्वार, मचान आणि काही प्राथमिक सुविधा उभारल्यानंतर निधीअभावी मिनी ट्रेनसह इतर आकर्षणे कागदावरच राहिली.

त्यामुळे आता वणीकरांचा सवाल स्पष्ट आहे — घोषणा आणि भूमिपूजनापुरतेच हे प्रकल्प मर्यादित राहणार का, की प्रशासन पुन्हा निधी उपलब्ध करून रुद्राक्षबनाला प्रत्यक्षात पर्यटनस्थळाचे रूप देणार?








