
चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील येत्या ६ एप्रिल २०२५ रोज रविवारला श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा स्वागत समिती २०२५ च्या माध्यमातून श्रीराम नवमी उत्सव धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने शहरात साजरा करण्यात येत आहे. श्रीराम नवमी निमित्त शहरातून सायंकाळी ४:३० वाजता शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा श्री काळाराम मंदिर येथून निघणार असुन जोड देऊळ, गांधी चौक, लक्ष्मी नारायण मंदिर, जटपुरा गेट, स्वामी नारायण मंदिर, गिरनार चौक यामार्गे परत श्री काळाराम मंदिर येथे पोहोचणार आहे. शोभायात्रेच्या मार्गावर विविध समाजसेवी धार्मिक संस्थेद्वारे प्रभु रामचंद्राच्या रथाचे पूजन करण्यात येईल. दरम्यान संपूर्ण शहर परिसरात १०० स्वागत द्वार लावण्यात येणार आहेत. शहरात तोरण, झेंडे, रोशनाई करण्यात येणार आहे. रामायण मधील विविध घटनांच्या झांकी तयार करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत शहरातील गणेश मंडळ आणि व्यायाम शाळेतर्फे देखावे सादर करण्यात येणार आहेत. सोबतच ६० ते ७० समुहांच्या माध्यमातून शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करणार आहे. शेवटी श्री काळाराम मंदिर येथे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या निमित्त होणाऱ्या शोभायात्रेत व महाप्रसादास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे, असे आयोजक समितीने म्हटले आहे.








