चंद्रपूर शहरालगतच्या सरकारी कोळसा खाणी वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडने वेढलेल्या पायली-भटाळी गावातील विविध समस्यांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हाधिकारी आज थेट गावात पोचले. या पायली -भटाळी गावाच्या सभोवताल कोळसा खाण असून सततच्या ब्लास्टिंग मुळे या गावातील घरांना तडे गेले आहेत. एकीकडे कोळसा उत्पादन जोरात सुरू असताना दुसरीकडे पुनर्वसन आवश्यक असताना नागरिकांच्या आरोग्याची व जीविताकडे मात्र सरकारी कोळसा कंपनीने दुर्लक्ष केले आहे. अशा स्थितीत अधिकाऱ्यांसह उपाययोजना जाणून घेण्यासाठी म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला. आगामी काळात याच भागात विधिमंडळाच्या विविध समित्या दौऱ्यासाठी येणार असून नागरिकांकडून थेट माहिती घेत ठोस अहवाल सादर केला जाणार आहे.








