◆ ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी दिला प्रभार
वणी वृत्तवेध : वणी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी मंगळवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी विद्यमान ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या प्रभार हस्तांतरण सोहळ्याला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

परीक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाने नुकतेच जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानुसार वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जिल्हा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशानंतर मंगळवारी प्रत्यक्ष पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

वणी पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व संवेदनशील पोलीस ठाणे मानले जाते. औद्योगिक परिसर, वाढती लोकसंख्या आणि विविध सामाजिक घडामोडी लक्षात घेता येथील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान नव्या ठाणेदारांसमोर असणार आहे.


दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी आशा वणीकरांनी व्यक्त केली आहे. नव्या ठाणेदारांच्या कार्यकाळाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








