◆ वणीतील तिघांचा सहभाग उघड
◆ दोघे चौकशीसाठी ताब्यात
वणी वृत्तवेध :मुंबईतील मनी लॉंड्री प्रकरणाचे धागेदोरे थेट वणीपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचचे विशेष पथक वणीत दाखल झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी येथे एमडी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू हा अद्याप फरार असून त्याचा मनी लॉंड्री प्रकरणाशी संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे.

तसेच वणी परिसरातील आणखी दोन जणांचाही या व्यवहारात सहभाग असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तिघांच्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपास मुंबई पोलीस करत असून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.


दरम्यान, या प्रकरणातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही नांदेपेरा गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
या मनी लॉंड्री प्रकरणात वणी शहरातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








