Home Breaking News बदलाची सुरुवात स्वतःपासून एसपी सायकलवर

बदलाची सुरुवात स्वतःपासून एसपी सायकलवर

◆ इंधन बचतीसाठी खाकीचा पुढाकार
◆ इतर अधिकारी आदर्श घेईल का ?

वणी वृत्तवेध : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत अनावश्यक वाहन वापर टाळण्याचे आणि पेट्रोलची बचत करण्याचे संदेश देशवासीयांना दिल्यानंतर आता प्रशासनातील अधिकारीही त्याचा अवलंब करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी थेट आपल्या निवासस्थानावरून सायकलने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सकाळच्या वेळी एसपी स्वतः सायकलवरून कार्यालयाकडे जात असल्याचे पाहून नागरिकांसह पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारीही आश्चर्यचकित झाले.

एसपींच्या या कृतीमुळे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि साधेपणाचा संदेश प्रशासनात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. “वरिष्ठ अधिकारी स्वतः पुढाकार घेत असतील तर आपणही बदलायला हवे,” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत आलिशान वाहनांतून फिरणाऱ्या काही अधिकाऱ्यांची मात्र यामुळे चांगलीच गोची झाली आहे. आता कार्यालयात येताना पायदळ किंवा सायकलचा पर्याय स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर येणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंतांच्या या सायकल स्वारीने केवळ इंधन बचतीचा संदेश दिला नाही, तर इतर अधिकाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देत “बदल स्वतःपासून सुरू करा” हा प्रभावी संदेश दिला आहे.

Previous articleघराकडे का बघतो म्हणून रक्तरंजित हल्ला”
Next articleरेल्वे आली… पण श्रेयाच्या डब्यात जागा कमी!
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे