◆ भाजपा मध्ये श्रेयवादाची लढाई
वणी वृत्तवेध :- बल्लारशाहा – मुंबई – बल्लारशाहा ही नवीन रेल्वे सुरू होताच प्रवाशांपेक्षा आधी “श्रेय एक्सप्रेस” सुटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रेल्वे मंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवत गाडी सुरू केली खरी, पण आता ही गाडी नेमकी कुणाच्या प्रयत्नाने धावली यावर भाजपातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये अदृश्य शिट्टी वाजली आहे.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनीही “ही रेल्वे माझ्याच पाठपुराव्यामुळे सुरू झाली” असा दावा केल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर तर समर्थकांनी जुनी पत्रे, निवेदने, फोटो, रेल्वे स्टेशनवरील सेल्फी आणि चहाच्या टपरीवरील चर्चादेखील पुरावा म्हणून पुढे आणल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सामान्य प्रवासी मात्र गोंधळात पडले आहेत. काहींनी तर “तिकीट कुणाकडून घ्यायचं? अहिर गट की मुनगंटीवार गट?” असा मिश्कील सवाल उपस्थित केला आहे. तर काही जणांनी “रेल्वेच्या इंजिनावर दोघांचेही फोटो लावा आणि विषय संपवा” अशी मध्यस्थीची भूमिकाही घेतली आहे.

विशेष म्हणजे रेल्वेमंत्री अस्विनी वैष्णव यांनी दोन्ही नेत्यांना स्वतंत्र पत्र पाठवत “आपल्या मागणीची दखल घेण्यात आली” असे म्हटल्याने आता श्रेयाचा चेंडू पुन्हा जनतेच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे “रेल्वे एकच… पण श्रेयाचे दोन डबे!” अशी चर्चा रंगली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय कुरघोड्या काही नवीन नाहीत. मात्र यावेळी रेल्वे सुरू झाल्याने जनता खूश आहे. आता सर्वसामान्य नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मागणी, “चंद्रपूर – पुणे रेल्वे सुरू करा… श्रेय कुणीही घ्या!पण गाडी सुरू करा असा सल्ला दिला जात आहे.
एकंदर काय, रेल्वे रुळावर आली असली तरी श्रेयाची गाडी अजूनही फुल स्पीडने धावत आहे!









