Home Breaking News अखेर जलकुंभ परिसरात टिनाचे कुंपण

अखेर जलकुंभ परिसरात टिनाचे कुंपण

◆ वणी वृत्तवेध च्या बातमीची दखल

◆ नगर पालिकेची तत्परता

वणी वृत्तवेध: शहराला शुद्ध पाणी की दूषित धोका?जलकुंभ परिसरातील धक्कादायक वास्तव” या मथळ्याखाली वणी वृत्तवेध ने दि 12 मे ला बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली आहे. शासकीय मैदानाजवळील जलकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व अस्वच्छता पसरल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने तत्काळ हालचाली सुरू करत संबंधित ठिकाणी टिनाचे कंपाऊंड उभारण्याचे काम केले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभ परिसरात उघड्यावर शौच व लघवी होत असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. तसेच पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबतही नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः सकाळच्या वेळी शासकीय मैदानावर फिरण्यासाठी येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे युवक-युवती यांना या अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

वणी वृत्तवेधने या समस्येवर प्रकाश टाकताच नगराध्यक्षा विद्या आत्राम व उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी याची दखल घेतली असून जलकुंभ परिसराभोवती टिनाचे संरक्षणात्मक कंपाऊंड उभारले. त्यामुळे आता संबंधित ठिकाणी अनधिकृत प्रवेशास आळा बसणार असून उघड्यावर शौच व लघवी करणाऱ्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे.

पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने पुढेही परिसराची नियमित स्वच्छता राखावी, सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि जलकुंभ परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून संरक्षित ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नावर तातडीने कारवाई केल्याबद्दल काही नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाचे स्वागत केले असून “प्रशासनाने अशीच तत्परता इतर नागरी समस्यांवरही दाखवावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

समस्येची गांभीर्याने दखल घेत जलकुंभ परिसरात तात्काळ टिनाचे संरक्षणात्मक कुंपण उभारण्यात आले आहे. शहरवासीयांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर प्रशासन तत्परतेने कार्यवाही करत राहील.”
विद्या आत्राम,
नगराध्यक्षा, वणी नगर

जलकुंभ परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी तातडीने टिनाचे संरक्षणात्मक कंपाऊंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काळातही शहरातील मूलभूत सुविधांबाबत नगर परिषद अधिक दक्षतेने काम करेल.”
राकेश बुग्गेवार,
उपाध्यक्ष, वणी नगर

Previous articleरेल्वे आली… पण श्रेयाच्या डब्यात जागा कमी!
Next articleरेल्वेच्या श्रेयावरून नवा वाद,संघर्ष आमचा, श्रेय कुणाचे?”
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे