- ◆ एक्सप्रेसवरून खासदार धानोरकर आक्रमक
◆ पाठपुरावा आणि जनतेच्या संघर्षाचे यश
वणी वृत्तवेध :-खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेस सुरू होण्यामागे सातत्यपूर्ण संसदीय पाठपुरावा आणि जनतेचा संघर्ष कारणीभूत असल्याचा दावा करत श्रेय घेण्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला मुंबई आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांशी थेट रेल्वे संपर्क मिळावा, ही केवळ वाहतुकीची गरज नसून विद्यार्थ्यांपासून रुग्ण, व्यापारी आणि कामगारांपर्यंत सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडलेली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत निवडून गेल्यानंतर प्रत्येक संसदीय सत्रात ‘शून्य प्रहर’सह विविध माध्यमांतून हा मुद्दा सातत्याने मांडला गेला. रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करत दबाव निर्माण केल्यानंतर अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस–बल्लारशाह एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, गाडीला मंजुरी मिळताच काही मंडळी केवळ पत्रकबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “दिल्लीपर्यंत प्रश्न पोहोचवून रेल्वे मंत्र्यांकडून निर्णय मंजूर करून घेणे आणि फक्त कागदोपत्री दावे करणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रपूर येथे मंजूर असलेल्या कोचिंग टर्मिनलचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रेल्वे सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाने या मागणीची दखल घेत घेतलेला निर्णय हा जनतेच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.
या नव्या रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारपूर आणि परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, कामगार तसेच मुंबईला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यामुळे जिल्हाभरातून समाधान व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेत निर्णय दिला असला तरी, हा विजय एका व्यक्तीचा नसून सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाचा असल्याचे धानोरकर यांनी स्पष्ट केले. पुण्यासाठी थेट रेल्वे सेवा आणि जिल्ह्यातील इतर प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पहा, खा. प्रतिभा धानोरकरांनी संसदेत मागणी केल्याचा व्हिडीओ








