◆ ऑनलाईन औषध विक्री विरोधात संप
वणी वृत्तवेध : देशभरात सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीविरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनानुसार दि. 20 मे रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे, सचिव श्रीकांत गारगाटे व कोषाध्यक्ष उज्वल पांडे यांनी ही माहिती दिली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.ऑनलाईन विक्रीदरम्यान औषधांची गुणवत्ता, एक्सपायरी, बनावट औषधे तसेच रुग्णांवर होणारे दुष्परिणाम याबाबत कोणतीही ठोस जबाबदारी घेतली जात नाही. अनेक रुग्णांना ऑनलाईन औषधांमुळे दुष्परिणाम सहन करावे लागल्याच्या घटना समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः नशेच्या औषधांची ऑनलाईन सहज उपलब्धता ही गंभीर सामाजिक समस्या बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची सत्यता तपासली जात नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने औषधांचा वापर वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असून बेरोजगारीची समस्या निर्माण होत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, 20 मे रोजी होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जीवनावश्यक औषधांची खरेदी 19 मेपूर्वी करून घ्यावी, असे आवाहन वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.सरकारने योग्य कार्यवाही न केल्यास भविष्यात बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.









