Home Breaking News रेती वाहनाच्या चालकाला नागरिकांनी दिला चोप

रेती वाहनाच्या चालकाला नागरिकांनी दिला चोप

◆ रात्रीस खेळ चाले रेतीचा

वणी वृत्तवेध : शहरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायद्याने रात्री रेती उत्खनन व वाहतुकीवर बंदी असतानाही शहरात “रात्रीस खेळ चाले रेतीचा” अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, भरधाव वेगाने धावणाऱ्या रेती वाहनाच्या चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना दि. २५ मे रोजी मध्यरात्री घडली.

माहितीनुसार, लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर काही युवक दुचाकीसह उभे असताना भरधाव वेगाने रेतीने भरलेला ट्रक त्यांच्या अंगावर येण्याच्या स्थितीत आला. थोडक्यात जीव वाचल्याने संतप्त झालेल्या युवकांनी वाहन थांबवत चालकाला पकडले आणि त्याला चांगलाच धडा शिकविला. परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, माजी नगरसेवक सिद्दीक रंगरेज व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला युवकांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला.सध्या रेती घाटांची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने घाटधारकांकडून मोठ्या प्रमाणात रेती साठवणुकीवर भर दिला जात असल्याची चर्चा आहे. शहराबाहेरील मोकळ्या जागांमध्ये रेतीचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असून, हे साठे नेमके कोणाचे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

विशेष म्हणजे रात्री वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वैध परवाने आहेत की नाहीत, याची तपासणी नेमकी कोण करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाच्या नजरेआड रात्रीभर सुरू असलेल्या या रेती वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता तरी प्रशासन या बेकायदेशीर रेती वाहतुकीवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous articleरेती वाहनाच्या चालकाला नागरिकांनी दिला चोप
Next articleशिस्तीचा ध्यास जपणारे क्रीडा गुरु हरपले
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे