◆ प्रा. प्रभाकर गाढवकर यांचे निधन
वणी वृत्तवेध :-येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक प्रभाकर गाढवकर यांचे आज दि. 26 मे रोजी वर्धा येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी विद्यार्थी, क्रीडाप्रेमी आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रा. गाढवकर हे केवळ क्रीडा शिक्षक नव्हते, तर शिस्त, वेळेचे भान आणि मेहनतीचे जिवंत उदाहरण होते. मैदानावर विद्यार्थ्यांच्या आधी उपस्थित राहणे, प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे आणि खेळासोबत संस्कार देणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असून आजही ते आपल्या गुरुंच्या शिकवणीचे स्मरण करतात.

“खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर आयुष्य घडवणारी शाळा आहे,” हा त्यांचा दृष्टिकोन अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला. कठोर शिस्तीमागे विद्यार्थ्यांविषयी अपार प्रेम आणि त्यांच्या यशाची तळमळ दडलेली असायची. त्यामुळेच विद्यार्थी त्यांना भीतीपेक्षा आदराने जास्त आठवतात.


आज एक शिस्तप्रिय शिक्षक, समर्पित क्रीडा मार्गदर्शक आणि अनेक खेळाडूंचा प्रेरणास्थान काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या वर आज सायंकाळी 5 वाजता वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.








