◆ चोरटा तिसऱ्या डोळ्यात कैद
वणी वृत्तवेध :- शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी हातचलाखी करत दुचाकीला लटकवलेल्या पिशवीतील तब्बल ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँकेतून खरेदीसाठी ५० हजार रुपये काढले होते. पैसे एका पिशवीत ठेवून त्यांनी ती दुचाकीच्या हँडलला अडकवली आणि ते निघाले. मात्र त्यांच्यावर चोरट्यांची आधीपासून नजर होती.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी अंगावर घाण टाकली. अचानक अंगावर घाण पडल्याने धोटे हे गांधी चौकातील देवडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबले व शर्ट साफ करू लागले. याच संधीचा फायदा घेत मागावर असलेल्या चोरट्याने दुचाकीला लटकवलेली पैशांची पिशवी क्षणार्धात लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला.


हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, पोलिसांनी अनेकदा नागरिकांना बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर कुठेही न थांबता थेट घरी जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.








