◆ नामनिर्देशन अर्जाची केली उचल
वणी वृत्तवेध :-येथील व्यावसायिक तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खंदे कार्यकर्ते मोरेश्वर उज्वलकर उर्फ लॉर्ड्स मोरू यांनी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन अर्जाची उचल केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी येत्या 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे तब्बल 453 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.


अशातच वणीतील व्यावसायिक तथा शिवसेना (उबाठा)चे सक्रिय कार्यकर्ते मोरेश्वर उज्वलकर यांनी नामनिर्देशन अर्ज उचलत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांनी अखेरपर्यंत उमेदवारी कायम ठेवत अर्ज दाखल करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








