Home Breaking News विधान परिषद निवडणुकीवर वणीत काँग्रेसचे मंथन

विधान परिषद निवडणुकीवर वणीत काँग्रेसचे मंथन

◆ प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या नावावर एकमत

वणी वृत्तवेध : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असतानाच वणी येथे काँग्रेस पक्षाने बैठक घेऊन आगामी निवडणुकीबाबत मंथन केले. या बैठकीत जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यास ज्येष्ठ नेते प्रा. टीकाराम कोंगरे यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती पुढे आली आहे.

१८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र महायुतीत ही जागा भाजपाला की शिवसेना शिंदे गटाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने दोन्ही पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये ही जागा शिवसेना उबाठा गटाने जिंकली होती. त्यामुळे या जागेवर त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक शिवसेना उबाठापेक्षा अधिक असल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी भावना काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, उमरखेड येथील एका नेत्याने मतदारांशी संपर्क सुरू केल्याची माहितीही समोर आली आहे.

वणी येथील वसंत जिनिंगमध्ये काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ॲड. देविदास काळे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टीकाराम कोंगरे, प्रदेश सचिव संजय खाडे, ॲड. राजीव कासावार, जयशिंग गोहोकार, विकेश पानघाटे, ओम ठाकूर यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत वणी येथून महाविकास आघाडीचा उमेदवार देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला ॲड. देविदास काळे आणि संजय खाडे यांच्या नावांवर चर्चा झाली. मात्र दोघांनीही निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर प्रा. टीकाराम कोंगरे यांचे नाव पुढे आले. चर्चेनंतर प्रा. कोंगरे यांनी निवडणूक लढविण्यास तयारी दर्शविल्याचे समजते.आता यवतमाळ विधान परिषदेची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण ठरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous articleबाजार समितीच्या जीर्ण पाण्याच्या टाकीमुळे धोका वाढला
Next articleविठ्ठल-रखुमाई मंदिरात सुरांची भक्तिमय मैफल
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे