Home Breaking News जावयाचे वाण’ सुरू असताना जावयावर रक्तरंजित हल्ला

जावयाचे वाण’ सुरू असताना जावयावर रक्तरंजित हल्ला

◆ शास्त्री नगर येथील घटना

वणी वृत्तवेध :हिंदू संस्कृतीत अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा जावयाचा सन्मान करण्याचा, त्याला वाण देण्याचा आणि आदर व्यक्त करण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. “अधिक मास आला की जावयाचा मान वाढला” अशी म्हणही प्रचलित आहे. मात्र अशाच पवित्र काळात वणीतील शास्त्रीनगर परिसरात जावयावरच झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसर हादरला आहे.

गुरुवारी मध्यरात्री बहिणीला पतीकडून कथित त्रास होत असल्याच्या संतापातून तिच्या भावाने थेट जावयाच्या घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अक्षय राजेंद्र बोढे (२८) हा गंभीर जखमी झाला असून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काका विजय बोढे आणि काकूंवरही हल्ला करण्यात आला. तिघांनाही गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

माहितीनुसार, अक्षय बोढे याचा विवाह चंद्रपूर येथील एका तरुणीसोबत झाला होता. वैवाहिक आयुष्यातील वाद आणि पत्नीच्या कथित तक्रारींमुळे तिचा भाऊ अमन रामानंद घागी संतप्त होता. गुरुवारी रात्री तो एका खागजी चारचाकी वाहनाने चार ते पाच सहकाऱ्याला घेऊन शास्त्रीनगर येथील अक्षयच्या घरी पोहोचला. अक्षय घरी आल्यानंतर बहिणीला होत असलेल्या कथित त्रासाच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले.

आरोपीने धारदार शस्त्राने अक्षयच्या मानेवर व शरीराच्या विविध भागांवर वार केले. बचावासाठी पुढे आलेल्या काका-काकूंनाही मारहाण व शस्त्राचे वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुख्य आरोपी अमन घागी ला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.या मध्ये एका अल्पवयीन मुलाचा ही समावेश असल्याची माहिती आहे या प्रकरणी बीएनएसच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अधिक मासातील परंपरा आणि वास्तव
अधिक मासात जावयाला लक्ष्मी-नारायणाचे स्वरूप मानून त्याचा सन्मान करण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. अशा काळात नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश दिला जात असताना, कौटुंबिक वादातून घडलेली ही हिंसक घटना समाजासाठी चिंतनाचा विषय ठरत आहे. “जावयाचा मान” जपणाऱ्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर “जावयावर वार” झाल्याची ही घटना सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

Previous articleहिवरा मजरा येथे शेतातील गोठ्याला आग
Next articleबेसा येथे भीषण आग, गोठ्यातील आठ बकऱ्या जळून मृत्युमुखी
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे