Home Breaking News बेसा येथे भीषण आग, गोठ्यातील आठ बकऱ्या जळून मृत्युमुखी

बेसा येथे भीषण आग, गोठ्यातील आठ बकऱ्या जळून मृत्युमुखी

◆ शेतकऱ्याचे दोन लाखांपर्यंत नुकसान

वणी वृत्तवेध :- तालुक्यातील बेसा येथे शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोठ्यात बांधून ठेवलेल्या आठ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तू गोहोकार हे शेतीसोबतच बकरीपालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी बकऱ्यांना शेतशिवारात चारण्यासाठी नेले होते. दुपारच्या सुमारास बकऱ्यांना गावातील गोठ्यात बांधून ते घरी परतले. त्यानंतर काही वेळातच गोठ्याला अचानक आग लागली.

गोठ्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला चारा असल्याने आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. धुराचे लोट आणि ज्वाळा दिसताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आग वेगाने पसरत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे वणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठ्यात बांधलेल्या आठ बकऱ्या जिवंत जळाल्या होत्या. आगीची तीव्रता इतकी होती की गोठ्यातील साहित्य व चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसलेल्या शेतकरी दत्तू गोहोकार यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बेसा गावात गरीब शेतकऱ्यावर आलेल्या संकटाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous articleजावयाचे वाण’ सुरू असताना जावयावर रक्तरंजित हल्ला
Next articleघोषणा नाही, कृतीतून दाखवली सामाजिक बांधिलकी
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे