◆ दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या
वणी वृत्तवेध : मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर, फाल्गुन गोहोकार आणि चंद्रकांत गावंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून ते तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी मनसे आज (दि. १ जून) वणी तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करणार आहे.

मनसेच्या माहितीनुसार, मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत कार्यरत कामगारांना तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानात काम करावे लागत होते. तसेच कामगारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कंपनी प्रशासन अपयशी ठरत असल्याची तक्रार मनसे कामगार सेनेकडून करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत मनसे नेते राजू उंबरकर यांनी कंपनी परिसरात जाऊन कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कंपनी प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.


मनसेच्या म्हणण्यानुसार, या चर्चेनंतर कंपनी प्रशासनाने काही सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनी प्रशासनाने मुकुटबन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे राजू उंबरकर, फाल्गुन गोहोकार आणि चंद्रकांत गावंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
हे गुन्हे कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठविल्यामुळे सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत या मागणी साठी तहसील कार्यालयावर धडक देऊन निवेदन देणार आहे









