Home Entrainment नगरसेवकांचे स्वप्न भंगले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माघार

नगरसेवकांचे स्वप्न भंगले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माघार

◆ नगरसेवकांचे ‘लक्ष्मी दर्शन’ हुकले!

वणी वृत्तवेध :-  यवतमाळ जिल्ह्यातील काही नगरसेवकांची अवस्था सध्या “मुंगेरीलाल के हसीन सपने”या मालिकेतील पात्रांसारखी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने उघड्या डोळ्यांनी रंगवलेली अनेकांची स्वप्ने ऐनवेळी भंगली आहेत.

विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी ताकदवान उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार, अशी चर्चा सुरू झाली. त्याचवेळी काही नगरसेवकांच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य झळकू लागले होते.

“यंदा काहीतरी मोठे घडणार!” या आशेने अनेकांनी आपल्या मनात वेगवेगळी गणिते मांडण्यास सुरुवात केली होती. काहींनी तर मिळणाऱ्या संभाव्य ‘राजकीय लाभाचे’ बजेटही तयार केल्याची चर्चा होती. बँकेचे हप्ते, मित्रांकडून घेतलेली उधारी, घरातील प्रलंबित कामे, नवीन वाहन खरेदी अशा अनेक योजनांना पंख फुटले होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी जिल्ह्यात दौरा करून नगरसेवकांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीगाठींमुळे अनेकांचा उत्साह आणखी वाढला. काहींनी तर निकाल लागण्यापूर्वीच आनंद साजरा करण्याची मानसिक तयारी केल्याचे बोलले जात होते.

मात्र, राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. ऐनवेळी साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी समोर आली आणि अनेकांच्या स्वप्नांचा फुगा क्षणात फुटला. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होताच जिल्ह्यातील काही नगरसेवकांचा उत्साह मावळल्याची चर्चा रंगली.

राजकीय वर्तुळात आता यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. “पाऊस येईल या आशेने चातक पक्षी जशी आकाशाकडे नजर लावून बसतो, तशी अवस्था काहींची झाली आहे,” अशी मिश्कील टिप्पणी केली जात आहे. तर काहींनी थेट “स्वप्न पाहायला हरकत नाही, पण अलार्म वाजल्यावर जागे व्हायलाही हवे!” असा टोला लगावला.

एकंदरीत, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेली स्वप्ने आणि त्यानंतर झालेली निराशा हा सध्या जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा सर्वात मनोरंजक विषय ठरला आहे. राजकारणात आशा-निराशेचा खेळ सुरूच असतो; मात्र यावेळी काहींचे “लक्ष्मी दर्शन”अगदी हाताशी येऊनही हुकल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे! त्यामुळे काही नगरसेवक आता ही निवडणूक बिनविरोध करू नये एक जरी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल तरी मतदान घ्या आमचा मतदानाचा हक्क हिराऊ नका अशी मागणी जिल्ह्याधिकारी यांचे कडे करण्याच्या तयारीला लागले आहे

 

Previous articleवणीच्या ठाणेदारपदी भानुदास पिदूरकर
Next articleठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी प्रभार स्वीकारला
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे