Home Breaking News Chandrapur… दिवाळीनंतर शासकीय कार्यालयात शुकशुकाट; अधिकारी सुट्टीवरच रमले, नागरिकांचे हाल

Chandrapur… दिवाळीनंतर शासकीय कार्यालयात शुकशुकाट; अधिकारी सुट्टीवरच रमले, नागरिकांचे हाल

0
51

Chandrapur

Chandataknews

 

 

चंद्रपूर,ता.३१ (प्रतिनिधी) दिवाळीनंतर जवळपास पंधरा दिवस उलटून गेले असतानाही चंद्रपूर जिल्हा परिषदेपासून शहर महानगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयांपर्यंत ठिकठिकाणी शुकशुकाट आहे. अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने सुट्टीवरच असल्याने नागरिक व ग्रामस्थांची कामे ठप्प पडली आहेत.

 

यंदा दिवाळीचा प्रारंभ १८ ऑक्टोबरच्या धनत्रयोदशीपासून झाला. त्याआधीच १७ ऑक्टोबर रोजी बहुतांश अधिकारी आपल्या गावी रवाना झाले होते. आठवडाभराची दिवाळी सुटी झाल्यानंतर २४ ऑक्टोबर हा कार्यदिवस होता. मात्र त्या दिवशीही अधिकाऱ्यांनी सुटी टाकल्याने सलग नऊ दिवसांच्या सुटीचा आनंद घेतला. सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरू होणे अपेक्षित होते; परंतु अजूनही अनेक अधिकारी व कर्मचारी रूजू झालेले नाहीत. काहींनी तर सुट्टी वाढवून ‘लाँग टूर’चा आनंद घेतला आहे.

 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता छबू बाराहाते यांसह अनेक अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा परिषदेतील कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे. नागरिक कार्यालयात आले की त्यांना “सर किंवा मॅडम सोमवारी येणार आहेत” असे सांगण्यात येते आहे.

 

 

अशीच अवस्था महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय भवनातील इतर विभागांचीही आहे. ग्रामस्थ व नागरिक दररोज चकरा मारत आहेत, परंतु कामे होत नसल्याने सर्वत्र नाराजी पसरली आहे. अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ कामावर रुजू व्हावेत व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here