Home Political खत खरेदीत ‘लिंकिंग’ केल्यास गाठ मनसेशी

खत खरेदीत ‘लिंकिंग’ केल्यास गाठ मनसेशी

◆ कृषी केंद्र चालकांना इशारा

वणी वृत्तवेध:खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी मशागत आणि खत-बियाणे खरेदीच्या तयारीत गुंतला आहे. मात्र, याचाच गैरफायदा घेत वणी उपविभागातील अनेक कृषी केंद्र चालकांनी खतांसोबत इतर अनावश्यक वस्तूंची विक्री (लिंकिंग) करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, कृषी केंद्र चालक “आमच्याकडून बी-बियाणे खरेदी केले तरच खत दिले जाईल” अशी अट घालत आहेत. मुख्य खतांसोबत गरज नसलेले बोगस टॉनिक, कीटकनाशके किंवा दुय्यम दर्जाची खते घेण्याची सक्ती केली जात आहे.

अनेक ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करण्याचे नियोजन सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वणी उपविभागातील सर्व कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात यावीत. जे दुकानदार ‘लिंकिंग’ची सक्ती करत आहेत, त्यांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, प्रत्येक कृषी केंद्राबाहेर उपलब्ध खतसाठा आणि शासकीय किंमत यांचा फलक लावणे अनिवार्य करावे.

येत्या ८ दिवसांच्या आत यावर ठोस कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय व संबंधित कृषी केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

निवेदन देतांना शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष रमेश पेचे , गोविंदरावजी थेरे, विलन बोदाडकर, विट्ठल हेपट, रवि आगसकांडे, लक्ष्मण उपरे, दिनेश डोंगे, मारोती पडवे, मंगेश झाडे, खुशाल पानघाटे, गौरव काकडे, कुणाल पायघन, राहुल बोधाने आणि शेतकरी उपस्थित होते. निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा कृषी अधिकारी आणि पोलीस ठाणे वणी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.

Previous articleवणी लायन्स कॉलेजचा उत्कृष्ठ निकाल
Next articleदणक्यात साजरा झाला पश्चिम बंगालचा विजय
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे