Home Breaking News शहराला शुद्ध पाणी की दूषित धोका ?

शहराला शुद्ध पाणी की दूषित धोका ?

◆ जलकुंभ परिसरातील धक्कादायक वास्तव

वणी वृत्तवेध : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचल्याचे समोर आले असून, यामुळे वणीकरांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः शासकीय मैदानाजवळील जलकुंभाखाली पसरलेल्या अस्वच्छतेमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली आहे.

वणी शहरात एकूण तीन जलकुंभ असून त्यापैकी एक प्रगतीनगर येथे तर दोन शासकीय मैदानाजवळ आहेत. या तिन्ही जलकुंभांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र शासकीय मैदान परिसरातील एका जलकुंभाखाली मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दररोज सकाळी शासकीय मैदानावर फिरण्यासाठी येणारे नागरिक तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे युवक-युवती सरावासाठी येथे येतात. मात्र परिसरात पसरलेल्या असह्य दुर्गंधीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.

नियमानुसार पाण्याच्या टाक्या संवेदनशील क्षेत्र मानल्या जातात आणि अशा ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास मनाई असते. मात्र संबंधित जलकुंभ परिसरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा संरक्षक भिंत नसल्याने काही नागरिक त्या ठिकाणी उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे.

पालिका प्रशासन शहराला शुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत असले तरी जलकुंभ परिसरातील या परिस्थितीमुळे त्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “खरोखरच वणीकरांना शुद्ध पाणी मिळते का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
दरम्यान, जलकुंभ परिसराची तातडीने स्वच्छता करावी, उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच जलकुंभाभोवती संरक्षण भिंत व सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous articleउकणी दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर खासदार धानोरकरांचा सवाल
Next articleरणरागिनींचा अवैध दारू, जुगार विरोधात एल्गार
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे