◆ विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात निवेदन
वणी वृत्तवेध :वागदरा आणि नांदेपेरा परिसरातील अवैध दारूविक्री, जुगार अड्डे आणि गांजा विक्रीविरोधात महिलांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. “दारूमुळे आमची घरे उद्ध्वस्त होत आहेत, युवक व्यसनाधीन होत आहेत आणि लहान मुलांचे भविष्य अंधारात जात आहे,” असा संतप्त सूर महिलांनी पोलिस प्रशासनासमोर व्यक्त केला.

वागदरा येथील महिलांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांचा संताप आणखी वाढला. अखेर महिलांनी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांची भेट घेत गावातील परिस्थिती मांडली.

या तक्रारीची दखल घेत विजय चोरडिया यांनी महिलांसह थेट वणी पोलीस स्टेशन गाठले आणि ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्याकडे अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. महिलांच्या म्हणण्यानुसार, वागदरा गावात तीन ते चार जण खुलेआम अवैध दारू विक्री करत असून गावात व्यसनाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे. अनेक कुटुंबे आर्थिक व सामाजिक संकटात सापडली असून काहींना जीव गमवावा लागल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला.

महिलांनी केवळ दारूविक्रीच नव्हे तर जुगार अड्डे आणि गांजा विक्रीही परिसरात सुरू असल्याचा दावा केला आहे. गावातील अवैध धंदे तातडीने बंद करण्याची मागणी केली.
“तीन दिवसांत कारवाई करा, अन्यथा महिलाच पुढे येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन छेडतील,” असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता पोलिस प्रशासन प्रत्यक्षात किती कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

निवेदनावेळी विजय चोरडिया, किशोर नांदेकर, शुभम गोरे, राहुल पारखी, सुधाकर गोरे यांच्यासह संगीता मुरस्कर, मनिषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, वसुधाताई ढगे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.








