◆ उन्हात महिलेचा चार तास ठिय्या
◆ अखेर मुख्याधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त
वणी वृत्तवेध :- “स्त्री ही फक्त सहन करणारी नाही, तर अन्यायाविरोधात उभी राहणारी शक्ती आहे,” याचा प्रत्यय आज वणी नगरपालिकेत आला. गेल्या चार दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी नगरपालिकेचा दरवाजा ठोठावला. मात्र समस्या ऐकून घेण्याऐवजी एका महिलेचा अपमान झाल्याचा आरोप होताच, त्या महिलेने थेट नगरपालिकेच्या आवारातच रणरागिणीचे रूप धारण केले.

विठ्ठलवाडी परिसरातील काही महिला नगरसेवकांसोबत मुख्याधिकारी सचिन गाडे यांची भेट घेण्यासाठी नगरपालिकेत पोहोचल्या होत्या. शहरातील पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची व्यथा त्या मांडत होत्या. मात्र यावेळी एका महिलेला बोलू न दिल्याने आणि तिच्याशी अपमानास्पद वर्तन झाल्याने ती महिला संतप्त झाली.

त्यानंतर त्या महिलेने भर दुपारी, तब्बल ४६ अंश तापमानात नगरपालिकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. “मुख्याधिकारी माफी मागत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही,” अशी ठाम भूमिका तिने घेतली. रखरखत्या उन्हात महिलेचा हा निर्धार पाहून पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.


दरम्यान मुख्याधिकारी यवतमाळकडे रवाना झाले होते. मात्र या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी त्यांना माघारी बोलावल्याची माहिती आहे. अखेर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुख्याधिकारी नगरपालिकेत परतले आणि संबंधित महिलेपुढे दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरच महिलेने आपला ठिय्या आंदोलन मागे घेतले.
बघा महिलेच्या आक्रोशाचा व्हिडीओ

या संपूर्ण प्रकारामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून, “लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एका सामान्य महिलेने अन्यायाविरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि प्रशासनाला झुकायला लावलेला निर्धार हा आजच्या घटनेचा केंद्रबिंदू ठरला.आजच्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, नारी ही केवळ सहनशीलतेचे प्रतीक नसून प्रसंगी अन्यायाविरोधात उभी राहणारी दुर्गाही आहे.








