Home Breaking News मराठी कामगारांच्या घामावर उद्योग, पण न्याय मात्र परप्रांतियांना?

मराठी कामगारांच्या घामावर उद्योग, पण न्याय मात्र परप्रांतियांना?

◆ सिमेंट कंपनी विरोधात मनसेचा एल्गार

वणी वृत्तवेध :-“महाराष्ट्राच्या मातीत कारखाने उभे राहतात, इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी वापरल्या जातात; मात्र नोकरीच्या वेळी मराठी तरुणांनाच डावलले जाते,” असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुकुटबन येथील सिमेंट कंपनीविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे.

झरी तालुक्यातील मुकुटबन परिसरातील सिमेंट कंपनीच्या पॅकिंग प्लांटमध्ये स्थानिक कामगारांना ४६ अंश तापमानात जीव धोक्यात घालून काम करावे लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना सिमेंटच्या धुळीत काम करणाऱ्या मराठी कामगारांची अवस्था अक्षरशः “भट्टीतील मजुरां”सारखी झाली असल्याचे चित्र समोर आले.

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कंपनी प्रशासनाला थेट जाब विचारण्यात आला. कामगारांना पिण्याचे थंड पाणी, पंखे, कुलर, विश्रांती कक्ष किंवा कॅन्टीनसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अनेक कामगारांना भर उन्हात रस्त्याच्या कडेला बसून जेवण करावे लागत असल्याचे वास्तव आंदोलनादरम्यान समोर आले.

यावेळी मनसेने सर्वात मोठा मुद्दा स्थानिक मराठी युवकांच्या रोजगाराचा उपस्थित केला. “वर्षानुवर्षे कंपनीत राबणाऱ्या भूमिपुत्रांना कमी करून बाहेरील राज्यांतील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे,” असा आरोप करत मनसेने कंपनीच्या धोरणावर जोरदार टीका केली.

मनसेच्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने थंड पाणी व कुलरची व्यवस्था सुरू केल्याची माहिती मिळाली. मात्र, “ही केवळ सुरुवात आहे. मराठी कामगारांना न्याय, सुरक्षितता आणि सन्मान मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.

महाराष्ट्रात उद्योग उभारून मराठी माणसालाच दुय्यम वागणूक देण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. स्थानिक युवकांना रोजगार, कामगारांना सुविधा आणि सुरक्षित वातावरण तात्काळ द्या; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभं राहील.”
राजू उंबरकर, मनसे नेते

Previous articleसंघर्ष, संवेदना आणि समाजकारण जपणारे नेतृत्व : संजय खाडे
Next articleबोगस सातबारा प्रकरणातील मास्टरमाईंड सतीश केराम अटकेत
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे