◆ शहरात काँग्रेसला नवा चेहरा मिळणार?
वणी वृत्तवेध :-काँग्रेस पक्षात नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू होताच वणी शहर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहराध्यक्ष पदासाठी तीन इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगली असून “मीच पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकतो” हे वरिष्ठांना पटवून देण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी काय समीकरण बदलतील याचा अंदाज खुद्द इच्छुकांनाही लागत नसल्याने वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे.

सध्या काँग्रेस पक्षाची तालुक्यातील अवस्था काहीशी बिकट मानली जात आहे. अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, तर काही जुने निष्ठावंत कॉंग्रेसी “पुन्हा एकदा पक्षाला उभारी देऊ” या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. एकेकाळी वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते, मात्र अंतर्गत गटबाजी आणि मतभेदांमुळे पक्ष वाढीला ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे.

आर्णी-वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसला दोन वेळा प्रतिनिधित्वाची संधी दिली. मात्र त्या संधीचे राजकीय सोने करण्यात स्थानिक पदाधिकारी अपयशी ठरल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला आपली पारंपरिक वणीची जागा शिवसेना उबाठाला सोडावी लागली. महाविकास आघाडीने जागा जिकली, पण स्थानिक काँग्रेस मात्र अधिक विस्कळीत झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

याच पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. युवा कार्यकर्ते विकेश पानघाटे यांच्या खांद्यावर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शहराध्यक्ष पदासाठी राजू अंकतवार, भास्कर गोरे आणि सेवा दलाचे रवी कोटावार यांनी वरिष्ठांकडे अर्ज सादर केल्याची माहिती आहे. काही “वेट अँड वॉच” नेतेही योग्य वेळेची वाट पाहत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आता पक्षश्रेष्ठी कुणाच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ घालणार, की ऐनवेळी एखादा “सरप्राईज चेहरा” पुढे आणणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कारण… ये कॉग्रेस है ये सब जाणते है ये काँग्रेस है









