◆उकणी खाणीत भीषण भूस्खलन
◆ दोन डंपर माती खाली दबले
वणी वृत्तवेध : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोली) उकणी खुल्या कोळसा खाणीत दि. ८ मे रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान भीषण भूस्खलन होऊन दोन डंपर गाळयुक्त मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. सुदैवाने दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत डंपरमधून बाहेर पडण्यात यश मिळविले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उकणी खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणावर मशीनद्वारे मातीचे उत्खनन करून कोळसा काढला जातो. जवळपास १०० मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर मिळतो. उत्खननामुळे खाणीत प्रचंड खोल खड्डे तयार झाले आहेत.पावसाळ्यात या खाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड (तलाव) मध्ये साठविले जाते.

त्याच पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना गुरुवारी अचानक शिल्डला लावलेली पार सरकल्याने गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाली आला. यात काम सुरू असलेले दोन डंपर पूर्णपणे मातीखाली गाडले गेले.घटनेनंतर काही काळ खाण परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही चालकांनी जीवाच्या आकांताने डंपरमधून बाहेर पडत इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वतःचा जीव वाचविला.


या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “वेकोली प्रशासन सुरक्षा सप्ताहाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करते, मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” असा आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडून काही कामगारांना जीव गमवावा लागल्याचेही कामगारांनी सांगितले.
दरम्यान, या गंभीर प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी वेकोली कामगारांनी केली आहे.









