Home Social “नियम धाब्यावर, डीजे जोरावर”

“नियम धाब्यावर, डीजे जोरावर”

◆ लग्नसराईत ध्वनीप्रदूषणाचा कळस
◆ परवानगीशिवाय धडाकेबाज डीजे

वणी वृत्तवेध : शहरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून डीजेच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे जगणे त्रासदायक झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविले जात असून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उघड उल्लंघन होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, एखाद्या सामाजिक कार्यक्रमाची जाहिरात करायची असल्यास प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु लग्नसोहळ्यांमध्ये डीजे बँड मोठ्या आवाजात वाजवले जात असतानाही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

रात्री १० नंतरही धडधडणारे साउंड सिस्टीम, बासचा तीव्र कंपन आणि कर्णकर्कश आवाज यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.

ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार ठराविक वेळेनंतर मोठ्या आवाजात ध्वनीवर्धक यंत्रणा वापरण्यास मनाई आहे. तरीही या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने “नियम फक्त कागदावरच का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील नागरिकांनी याबाबत त्वरित कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. डीजे बँडवर वेळेचे व आवाजाचे बंधन कडकपणे लागू करावे, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

समाजातील आनंदोत्सव साजरे करताना इतरांच्या शांततेचा भंग होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रशासनानेही नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

Previous articleदणक्यात साजरा झाला पश्चिम बंगालचा विजय
Next articleखाजगी स्कूल बस व दुचाकीचा अपघात
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे