◆ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाही
वणी वृत्तवेध :वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहर परिसरात फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. पोलीस ठाणे वणी येथे दाखल असलेल्या बकरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जत्रा मैदान परिसरात थांबले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत सीताराम आसाराम भिसे (वय २४), सुनील रामप्रसाद साळुंखे (वय २७) व संजय राजू वायकर (वय २३), सर्व रा. गोकुल नगर, वणी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी वणी पोलीस ठाणे हद्दीतील बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच २०२४ ते २०२६ या कालावधीत वणीसह इतर भागांतही बकरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची माहिती उघड झाली.

चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सुनील साळुंखे याच्या ताब्यातून चोरीतील विक्रीची ७० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक MH-29-BE-8012) जप्त करण्यात आले. जप्त वाहनाची किंमत अंदाजे ३ लाख १० हजार रुपये असून एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच आरोपींनी पोलीस ठाणे पारवा व वडकी येथे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील सचिन वायकर हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज डाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पितुस्कर, पोका सलमान शेख व चालक पोदवा नरेश राऊत यांनी यशस्वीरित्या पार पाडली.









