◆ उपचाराऐवजी रेफरचा खेळ
वणी वृत्तवेध :वेकोली भालर परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एरिया ऑफिसमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेले चमन केशवराव तांबेकर यांना दुसऱ्या शिफ्टदरम्यान रात्री अचानक फिट आली. रात्री सुमारे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान ते जागेवरच कोसळले. वेदनेने तडफडणाऱ्या तांबेकर यांना सहकाऱ्यांनी तत्काळ वेकोली भालर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे प्राथमिक उपचार करून जबाबदारी झटकत त्यांना वेकोली च्या पॅनलवर असलेल्या शहरातील हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, वेकोली भालर रुग्णालयात तब्बल ७ एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असतानाही गंभीर अवस्थेतील रुग्णाला तत्काळ प्रभावी उपचार देण्यात अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, वेकोलीच्या पॅनलवर असलेल्या हॉस्पिटलनेही रुग्णाला भरती करून घेण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, भालर येथील सीएमओ यांनी रुग्णाला चंद्रपूर येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने कुटुंबीयांनी वणी येथील डॉ. मेश्राम यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ. मेश्राम यांनी तत्काळ उपचार सुरू करून अवघ्या एका तासाच्या आत रुग्णाची प्रकृती स्थिर केली.


एका खासगी डॉक्टरांनी अल्पावधीत रुग्णाला रिकव्हर केले, मग वेकोलीच्या सुसज्ज रुग्णालयात आणि पॅनलवरील हॉस्पिटलमध्ये हे शक्य का झाले नाही? असा सवाल आता कामगार व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे वेकोलीच्या आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा, समन्वयाचा अभाव आणि रेफर संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.








