Home Political वणी शहर विकासाला मिळणार बूस्टर डोस ?

वणी शहर विकासाला मिळणार बूस्टर डोस ?

◆ १० कोटी निधीसाठी पाठपुरावा
◆ बोदकुरवारांनी घेतली उपमुख्यमंत्र्याची भेट

वणी वृत्तवेध : वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत थेट मुंबई गाठली असून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहर विकासासाठी तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. या भेटीत शहर विकासाच्या विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.

वणी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असून शहराच्या विकासासाठी विविध कामांचा धडाका सुरू आहे. मागील पंचवार्षिक काळातही भाजपाच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता नव्या टप्प्यात शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासू लागली आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते बांधकाम, नाल्यांची दुरुस्ती, सौंदर्यीकरण, बगीचे उभारणी तसेच मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विविध प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या सर्व कामांना आर्थिक बळ मिळावे यासाठी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शहर विकासाचा आराखडा सादर केला.

यावेळी वणी शहराच्या वाढत्या गरजा, नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक संकेत दिल्याने वणीकरांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळणारा निधी हा वैशिष्ट्यपूर्ण निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती असून निधी मंजूर होताच नगरपालिकेमार्फत विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.वणी शहराच्या विकासासाठी सुरू असलेल्या या पाठपुराव्यामुळे येत्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामांचा वेग वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Previous articleवेकोलीच्या आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड
Next articleसामाजिक बांधिलकीतून साजरा झाला संजय खाडे यांचा वाढदिवस
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे