Home Social सामाजिक बांधिलकीतून साजरा झाला संजय खाडे यांचा वाढदिवस

सामाजिक बांधिलकीतून साजरा झाला संजय खाडे यांचा वाढदिवस

वणी वृत्तवेध :- वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याची संधी… आणि हाच संदेश देत शेतकरी, कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस वणी शहरात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

रक्तदानापासून वृद्धाश्रम भेटीपर्यंत आणि रुग्णसेवेपासून नव्या व्यावसायिक प्रवासाच्या शुभारंभापर्यंत दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. त्यामुळे वाढदिवसाला सामाजिक सेवेची अनोखी किनार लाभली.

सकाळी शेतकरी मंदिर, वणी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराने दिवसाची सुरुवात झाली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देणाऱ्या या शिबिरात युवकांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी निभावली. लाईफलाईन रक्तपेठी, नागपूर यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संजय खाडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

दुपारच्या सत्रात वणीजवळील पळसोनी येथील बाजीराव वृद्धाश्रमात वृद्धांना कपडे, चप्पल व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना आधार आणि आपुलकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

संध्याकाळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनंजय खाडे संचालित “डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नव्या उपक्रमाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यानंतर शेतकरी मंदिर येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात वणी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Previous articleवणी शहर विकासाला मिळणार बूस्टर डोस ?
Next articleआज सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे