Home Sports झेयु ऐलेव्हन संघाने पटकावला मनसे चषक

झेयु ऐलेव्हन संघाने पटकावला मनसे चषक

अंतिम सामना ठरला एकतर्फी
वणी वृत्तवेध :चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या अंतिम सामन्यात झेयु इलेव्हन संघाने एकतर्फी खेळ करत यवतमाळ नाईट रायडर्सचा पराभव केला आणि वणी प्रीमियम लीग 2026 टेनिस बॉल स्पर्धेतील मनसे चषक पटकावत अजिंक्यपद मिळवले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रात्रकालीन स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लिलाव पद्धतीने संघांची बांधणी करण्यात आली होती, ज्यामुळे स्पर्धेत रंगत आणखी वाढली होती. नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे प्रत्येक सामना रोमांचक ठरला.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात झेयु इलेव्हनने प्रथम फलंदाजी करत 94 धावांचे आव्हान उभे केले. तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या यवतमाळ नाईट रायडर्सकडून जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा होती. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची फलंदाजी ढेपाळली. शेवटच्या षटकात 36 धावांची गरज असताना झेयु इलेव्हनच्या अचूक आणि घातक गोलंदाजीसमोर रायडर्सचा डाव कोलमडला आणि सामना झेयु इलेव्हनच्या बाजूने गेला.
स्पर्धेतील विजेत्या झेयु इलेव्हन संघाला 4 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक नगर परिषदचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपविजेत्या यवतमाळ नाईट रायडर्स संघाला 2 लाख 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.वैयक्तिक कामगिरीत रवी राजूरकर याने ‘मॅन ऑफ द सिरीज’ तर सोहेब खान याने ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान पटकावला. यावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वाहतूक सेनेचे इर्शाद खान, लकी सोमकुवर यांच्यासह अनेक पदाधिकारी व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
Previous articleवणीत एम डी ड्रग्ज जप्त, दोघे ताब्यात
Next articleमहाराष्ट्र दिनी ‘वणी वृत्तवेध’चा शुभारंभ
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे