Home Breaking News बिट कॉईनच्या मोहात पडून वणीकरांनी लाखो गमावले

बिट कॉईनच्या मोहात पडून वणीकरांनी लाखो गमावले

◆ प्राध्यापक, शिक्षक,व इंजिनीयर यांचा समावेश

वणी वृत्तवेध :“घरबसल्या कमवा”, “52 दिवसांत पैसे डबल”, “आज गुंतवा उद्या श्रीमंत व्हा” अशा गोड बोलांनी शहरातील अनेक सुशिक्षितांना डी एस जे एक्सचेंज प्लटफॉर्म वरून ऑनलाईन बिटकॉईन ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकले असून आता मात्र अनेकांच्या हातात “डिजिटल धुपाटणे” आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरात बिटकॉईन ट्रेडिंग व ऑनलाईन मार्केटिंगच्या नावाखाली मोठे नेटवर्क उभे करण्यात आले. सुरुवातीला काही जणांनी थोडीफार गुंतवणूक केली आणि त्यांना पैसेही मिळाले. “पैसे आले म्हणजे योजना खरीच असणार” असा समज करून अनेकांनी मित्र, नातेवाईक, सहकारी यांनाही यात ओढले.

यानंतर या “डबल पैशांच्या खेळात” प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, व्यापारी अशा उच्चशिक्षित व प्रतिष्ठित मंडळींचीही एंट्री झाली. काहींनी लाखोंची गुंतवणूक केल्याची चर्चा असून, सुरुवातीचा नफा पाहून अनेकांनी “बँकेपेक्षा बिटकॉईन भारी!” असा विश्वास ठेवला.आणि मिळालेल्या नफ्या सह परत गुंतवणूक केली.

मात्र जसे-जसे सदस्य वाढले तसे कंपनीचे नवे-नवे नियम समोर येऊ लागले.कधी “TDS भरा”, कधी “अकाउंट व्हेरिफिकेशन फी”,तर कधी “प्लॅटफॉर्म अपडेट चार्ज”च्या नावाखाली पैसे मागितले जाऊ लागले.“आता एवढे भरलेच आहेत तर अजून थोडे भरू” या मानसिकतेत अनेकांनी 12 टक्के अतिरिक्त रक्कमही जमा केली. पण त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. उलट आता कंपनीने “नवीन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लॉन्च” केल्याचे सांगत पुन्हा 100 डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार रुपये भरण्याची अट टाकली आहे.

दरम्यान, सतत पैशांची मागणी होत असल्याने काही गुंतवणूकदारांना संशय आला असून वणीतील काहींनी नागपूर सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.शहरात आता या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून,“इतरांना गुंतवणुकीचे धडे देणारेच स्वतः फसले” “क्रिप्टोच्या नादात क्रेडिट गेले”,अशा मिश्कील प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.तर काही गुंतवणूक दारांनी तर डबल बोलकर चुना लगा दिया 30 हजार का असे स्टेट्स देखील ठेवले आहे.

कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या हव्यासापायी केवळ सर्वसामान्यच नव्हे तर उच्चशिक्षित लोकही अशा ऑनलाईन आमिषांना बळी पडत असल्याचे या प्रकारातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही ऑनलाईन गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनीची शासकीय नोंदणी, अधिकृत परवानगी व आर्थिक व्यवहारांची खातरजमा करणे गरजेचे आहे.

Previous articleरात्री बकऱ्या चोरायचे, दिवसा बाजारात विकायचे
Next articleपाच वर्षांत 120 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे