◆ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन
◆ शैलेश वाकडे अद्याप फरार
वणी वृत्तवेध :वडगाव (धं) येथील बनावट सातबारा व बोगस फेरफाराच्या आधारे भूखंड विक्री करून फसवणूक केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अखेर मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सतीश केराम याला वणी पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी शैलेश वाकडे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणात महसूल विभागातील तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक होण्याची शक्यता लक्षात घेता दोघांनी पांढरकवडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अटी व शर्थींच्या अधीन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

फिर्यादी सूरज रमेश चाटे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सतीश केराम, शैलेश वाकडे, तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमताने व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


तक्रारीनुसार, मौजा वडगाव (धं) येथील भूखंड शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगून फिर्यादींना सातबारा, फेरफार आणि नकाशा दाखविण्यात आला होता. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्यानंतर फिर्यादींकडून १ लाख २० हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला. मात्र नंतर संबंधित भूखंड प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे उघड झाले.
या कारवाईमुळे महसूल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बनावट फेरफारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जमीन घोटाळ्यांचे आणखी धक्कादायक तपशील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









