Home crime ग्रामीण भागात पसरले आहे बनावटी बँक खात्याचे जाळे

ग्रामीण भागात पसरले आहे बनावटी बँक खात्याचे जाळे

◆ मुंबई क्राईम ब्रँचच्या रडारवर बँक खाती

वणी वृत्तवेध :मुंबई क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर वणी शहरासह ग्रामीण भागात एका धक्कादायक आर्थिक रॅकेटची चर्चा रंगली आहे. अल्प मोबदल्याच्या आमिषाने युवकांकडून बँक खाती भाड्याने घेऊन त्यातून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून ग्रामीण भागातील बँक खात्यावर तपास यंत्रणांनी  लक्ष केंद्रीत केले आहे.

रविवारी (10 मे) मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने वणी परिसरात छापेमारी करत दोन युवकांना ताब्यात घेतले. गणेश गौहोकर आणि पवन चहानकर अशी त्यांची नावे असून ते नांदेपेरा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीनंतर दोघांनाही पुढील तपासासाठी मुंबईला नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये सक्रिय टोळ्या ग्रामीण भागातील युवकांना लक्ष्य करत असल्याचे या कारवाही वरून दिसून येत आहे. विशेषतः बेरोजगार युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मजूर वर्गाला पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडून घेतली जात होती किंवा आधीपासून अस्तित्वात असलेली खाती वापरली जात होती.

यासाठी खातेदारांकडून एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिम तसेच इंटरनेट बँकिंगची संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणूक, सायबर ठगी, हवाला व्यवहार आणि कथित मनी लॉन्ड्रिंगसाठी होत असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

माहितीनुसार, वणी शहर आणि परिसरातील अनेक बँक खाती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहेत. काही खात्यांत अल्पावधीत लाखो ते कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची बाब समोर आली असून अनेक व्यवहारांतील रक्कम तात्काळ इतर राज्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सायबर सेल, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा सखोल मागोवा घेत असल्याची माहिती आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या या कारवाईमुळे वणी परिसरातील अवैध आर्थिक नेटवर्कबाबत मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

. स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, मोबाईल सिम किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती इतरांना देणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो,  संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधावा खात्यातून अवैध व्यवहार झाल्यास संबंधित खातेदारावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे

गोपाल उंबरकर, ठाणेदार वणी

 

Previous articleउच्च शिक्षणासोबत रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची संधी
Next articleसिबीएसई बारावीत स्वर्णलीला ची महिमा अव्वल
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे