◆ बोगस सातबार्याचा भूखंड प्रकरण
◆ चारही आरोपी अद्याप फरार
वणी वृत्तवेध :वडगाव (धं) येथील बनावट सातबारा आणि बोगस फेरफाराच्या आधारे प्लॉट विक्री करून फसवणूक केल्याच्या गाजत असलेल्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मंडळ अधिकारी राजू डोंगरे आणि तलाठी रविंद्र उपरे यांनी अटक टाळण्यासाठी पांढरकवडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

फिर्यादी सूरज रमेश चाटे यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी तलाठी रविंद्र उपरे, मंडळ अधिकारी राजू डोंगरे, सतीश केराम आणि शैलेश वाकडे यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमताने व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगून सातबारा, फेरफार व नकाशा दाखविण्यात आला होता. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्यानंतर फिर्यादींकडून १ लाख २० हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला. मात्र नंतर संबंधित प्लॉट प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे उघड झाले.


चौकशीत फेरफार क्रमांक १५३९ हा पूर्णपणे बोगस असल्याचे समोर आले असून, दाखविण्यात आलेला व्यवहार कधीच झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित फेरफार रद्द करण्यासाठी तलाठ्यानेच प्रस्ताव दाखल केल्याची बाबही समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक होण्याची शक्यता लक्षात घेता मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने पांढरकवडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
सतीश केराम आणि शैलेश वाकडे हे दोघेही अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे महसूल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बनावट फेरफारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जमीन घोटाळ्यांचे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









